आईसह दोन चिमुकल्यांना संपवलं, पुण्याच्या रांजणगावमधील तिहेरी हत्याकांडाचा अखेर खुलासा, १० दिवसांनी आरोपीला बेड्या…


पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पुणे अहिल्यानगर महामार्गावर असणाऱ्या रांजणगाव परिसरामधील ग्रोवेल कंपनीच्या पाठीमागे एक महिला आणि दोन लहान मुले यांचे मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. अशातच या खुनाचा आता उलघडा झाला आहे.

स्वाती केशव सोनवणे (वय. २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव) आणि तिची दोन लहान मुले स्वराज (वय.३) आणि विराज (वय.१) यांचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला होता. या खुनाचे गूढ उकलण्यात ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणात गोरख पोपट बोखारे (वय. ३६, रा. सरदवाडी, ता. शिरूर, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, गोरख हा स्वातीच्या पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करायचा. याच दरम्यान स्वाती आणि गोरख यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. स्वातीने गोरखकडे लग्नासाठी तगादा लावला होता. २३ मे रोजी गोरखने स्वाती आणि तिच्या मुलांना घरी घेऊन जाण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवरून नेले. वाटेत त्याने एका पेट्रोल पंपावरून बाटलीत पेट्रोल घेतले.

त्यानंतर त्याने रस्त्यात आडबाजूला नेऊन स्वाती आणि तिच्या निष्पाप मुलांचा खून केला. त्यांची ओळख पटू नये यासाठी त्याने त्यांच्या डोक्यात दगड घातला आणि पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी पाऊस पडल्याने मृतदेह पूर्णपणे जळाले नाहीत आणि ते अर्धवट अवस्थेत सापडले. यामुळेच पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.

रांजणगाव परिसरातील खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे मृतदेह २५ मे रोजी सापडले होते. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटवणे सुरुवातीला कठीण झाले होते. मात्र, बीड जिल्ह्यातील स्वाती सोनवणे मुलांसह बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे आणि स्वातीच्या वर्णनाचे साम्य जुळल्याने पोलिसांचा संशय बळावला. स्वातीच्या पतीची चौकशी केली असता, वाद झाल्याने ती आळंदीला माहेरी गेल्याचे त्याने सांगितले. तिच्या आई-वडिलांची चौकशी केल्यावर, ती २३ मे रोजी बहिणीचा दीर गोरख बोखारे याच्यासोबत दुचाकीवरून गेल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, या माहितीच्या आधारे पोलिसांनी नगर रस्त्यावरील सरदवाडीमधून गोरखला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गोरख एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करत होता. चौकशीदरम्यान त्याने खून केल्याची कबुली दिली. न्यायालयाने बोखारेला 11 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!