कर्तव्यावरील पोलिस हवालदार मिथुन धेंडे यांचा चिरडून खून केल्याप्रकरणी दोघांना अटक; बेधुंद कंटेनरवर कारवाई करताना घडला होता प्रकार….

उरुळी कांचन : मुंबई-पुणे महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात चाकण फाट्यावर कर्तव्यावरील वाहतूक पोलीसाला ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.

मिथून धेंडे (वय-३९, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. रोहन इसब खान ( वय २४, व् रा. ग्रामसिंगार, तहसील. पुनाना, ठाणा. हिंदाना, जिल्हा. मेवात, हरियाणा), उमर दिन मोहम्मद (वय १९ , व्यवसाय: क्लिनर, रा. ग्राम. बरसाना, तहसील. छाता, ठाणा. मथुरा, राज्य. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे, जे वडगाव पोलीस स्टेशन येथे नेमणुकीवर होते, ते वडगाव फाटा येथे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे एपीआय शीतलकुमार डोईजड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना, अक्षय पॅलेस, वडगाव कमानीजवळ मुंबई बाजूकडून तळेगाव बाजूकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्यांना माहिती दिली की, वाहन क्रमांक HR 74 B 3677 चा चालक अतिशय धोकादायकरीत्या वाहन चालवत आहे. सदर वाहन थांबवले नाही, तर तो एखादा मोठा अपघात घडवून निष्पाप नागरिकांचे प्राण घेऊ शकतो, असे नागरिकांनी सांगितले.

ही माहिती गांभीर्याने घेऊन शासकीय वाहनाचे चालक गणपत होले यांनी त्वरित फोनवरून वडगाव नाका येथे वाहतूक नियमनाचे काम करत असलेल्या हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना ही माहिती दिली. हे ठिकाण सुमारे १ किमी अंतरावर होते. त्याअनुसार, हेड कॉन्स्टेबल धेंडे यांनी संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी, त्यांच्यासोबतच्या ट्रॅफिक वॉर्डन व नागरिकांच्या मदतीने संबंधित वाहनाला मुंबई-चाकण रोडवरील पूजा हॉटेलसमोर थांबवले.
तेव्हा वाहनचालकाने “नीचे आता हूँ” असे बोलले. त्या वेळी वाहन थांबलेले असताना, हेड कॉन्स्टेबल धेंडे हे वाहनाच्या समोर डाव्या बाजूस उभे होते. अचानक, वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अतिशय वेगाने चालवून, धेंडे यांना पुढे उभे असताना जाणीवपूर्वक धडक दिली, ज्यात ते गंभीर जखमी झाले आणि तो चालक चाकणच्या दिशेने पळून गेला. यानंतर, हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना त्वरित पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, कुंडलिक पंढरीनाथ सुतार च्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०३ व भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), कलम २८१, मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १७७, १८३, १८४ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
स्थानीय गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ग्रामीण यांचे पोलीस निरीक्षक अविनाश शिलीमकर यांच्या पथकाने, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मदतीने, तांत्रिक तपासाअंती आरोपींना ताब्यात घेतले आहे.