विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! शाळांपासून 50 मीटर परिसरात नवा नियम लागू


मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, सकस आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळा, अंगणवाडी आणि वसतिगृहांमध्ये विना परवाना अन्नपुरवठ्यावर बंदी जाहीर केली आहे. तसेच शाळांच्या 50 मीटर परिसरातील खाद्यविक्रेत्यांवरही आता कडक नियम लागू करण्यात येणार आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अन्नसुरक्षेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. राज्यातील सुमारे दोन कोटी विद्यार्थी शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेत असून त्यांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय आहारासंदर्भातील नियम 2020 मध्ये तयार करण्यात आले असून 2021 पासून त्यांची अंमलबजावणी सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या नियमांनुसार राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा, अंगणवाड्या आणि वसतिगृहांमध्ये अन्नपुरवठा करणाऱ्या प्रत्येक पुरवठादाराकडे एफएसएसएआय (FSSAI) परवाना असणे बंधनकारक राहील. परवाना नसलेल्या कोणालाही या संस्थांमध्ये अन्नपुरवठा करता येणार नाही.

याशिवाय शाळेपासून 50 मीटर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते आणि दुकानदारांनाही भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचे पालन करावे लागणार आहे. विना परवाना खाद्यपदार्थांची विक्री पूर्णपणे बंद राहणार असून याची जबाबदारी संबंधित शाळा प्रमुखांवर असेल. हे नियम 22 महिन्यांच्या बालकांपासून बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांना लागू असतील.

प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड लावणे, अन्नसुरक्षेसाठी सुपरव्हायझर आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच वर्षातून दोन वेळा अन्नसुरक्षेची तपासणी केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांनाही सूचना देण्यात येणार असून शाळांमधील कँटीन अधिक सुरक्षित आणि दर्जेदार बनवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!