तुकाराम मुंढेंचा धडाका अन् चौफुल्यात खलबते! अवैध गूळ उत्पादकांची गुप्त बैठक चर्चेत, नेमकं काय घडलं?

दौंड : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळविरोधी मोहिमेला वेग दिल्यानंतर भेसळखोर आणि अवैध व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील काही गुऱ्हाळचालक आणि मालकांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौफुला येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात ही बैठक पार पडली. या बैठकीत गुऱ्हाळ व्यवसायाशी संबंधित काही जण उपस्थित होते. अन्न व औषध प्रशासनाच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका काय असावी, यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांत तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थ, तेल, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर उत्पादनांवर राज्यभरात धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध भागांतील व्यावसायिकांमध्ये प्रशासनाच्या कारवाईबाबत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अवैध व्यवसाय, भेसळयुक्त पदार्थांची निर्मिती किंवा आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्यांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असल्याचे सांगितले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही यापूर्वी प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दौंड तालुक्यातील या कथित बैठकीनंतर प्रशासनाच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भेसळविरोधी मोहिमेला अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.