पुण्यात तुकाराम मुंढेंचा पुन्हा दणका! 24 तासांत 10 आस्थापनांचे परवाने निलंबित; प्रसिद्ध गोल्डन बेकरीलाही टाळं


पुणे : अन्न व औषध प्रशासनाने पुण्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील हॉटेल्स, बेकरी आणि कॅन्टीनवर मोठी कारवाई करत १० आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित केले आहेत. गुरुवार आणि शुक्रवारी राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आणि अस्वच्छता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

एफडीएच्या तपासणीत अनेक ठिकाणी अन्नपदार्थ अत्यंत गलिच्छ वातावरणात तयार केले जात असल्याचे उघड झाले. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, स्वच्छतेच्या निकषांकडे दुर्लक्ष आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. कारवाईदरम्यानचे फोटोही एफडीएने प्रसिद्ध केले असून, त्यातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पुण्यातील कोंढवा येथील गोल्डन बेकरी, येवलेवाडीतील गोल्डन मॅजेस्टिक बेकरी, मंगळवार पेठेतील स्टार केटरिंग सर्व्हिस, सोमवार पेठेतील अशोक बार अँड रेस्टॉरंट आणि बाणेरमधील बिकांगे बिर्याणी एलएलपी या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

याशिवाय पुणे जिल्ह्यातील अंबेगाव तालुक्यातील सिद्धार्थ ॲग्रो-डेअरी, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा आणि सिगडी रेस्टॉरंट, कोल्हापूरमधील व्हीबीजीओआर शाळा कॅन्टीन, तसेच सांगलीतील हलद भवन कॅन्टीन यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

एफडीएने स्पष्ट केले की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाची गय केली जाणार नाही. अशा तपासणी मोहिमा पुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!