उन्हाळ्यात प्रवास होणार थंडगार!! एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पुणे : राज्य सरकारने 2640 नवीन एसी एसटी बसेस लवकरच सेवा पुरवण्यासाठी टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक महिन्यात 300 नव्या बसेस ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे गावागावांतील नागरिकांना आता वातानुकूलित सुविधांसह प्रवास करता येणार आहे.
याबाबत एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी माहिती दिली. सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना गारवायुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी दर महिन्याला 300 नव्या वातानुकूलित बस सेवेत दाखल होणार आहेत.
उन्हाळी सुट्ट्या सुरु होताच अनेक चिमुकल्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना गावी जाण्याचे वेध लागतात. यंदा या वाढलेल्या मागणीला सामोरे जाण्यासाठी एसटी महामंडळाने 872 वातानुकूलित शिवशाही बसेस मार्गावर धावणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये कोकण, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, नागपूर, जळगाव, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे प्रवासी अधिकाधिक एसी बसच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरणार आहे. शिवाय शाळांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि उपनगरातून कोकण व इतर भागांत जाणाऱ्या चाकरमान्यांनाही या सुविधा दिलासा देतील. यामुळे याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत परवडणाऱ्या दरात आणि आरामदायक प्रवासाची संधी या माध्यमातून मिळणार आहे. मुंबई सेंट्रल आणि परळ आगारातूनही विशेष अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत. अशा प्रकारे एसटी महामंडळाला उत्पन्नातही चांगली भर पडण्याची शक्यता आहे.
याबाबत प्रवाशांची गेल्या काही दिवसांपासून मागणी होती. उन्हाळ्यात साध्या बसमधून प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सध्या एसटी महामंडळावर मोठा बोजा आहे. तिकीट दरात मोठी सूट असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे बस नेमक्या कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.