शेतात जात असताना ट्रॅक्टर पलटी, यशवंतचे माजी संचालक भीमराव टिळेकर यांचे निधन, परिसरात हळहळ..

उरुळीकांचन : टिळेकरवाडी (ता.हवेली ) येथील प्रगतशील शेतकरी व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भीमराव यशवंत टिळेकर (वय- 73) यांचे आज शुक्रवारी (ता. 11) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भीमराव टिळेकर हे ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले होते.
यावेळी ट्रॅक्टरवरील त्यांचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर त्या ठिकाणी पलटी झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
भवरापूरचे पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर यांचे ते वडील होत. भीमराव टिळेकर यांच्या निधनाने उरुळी कांचन, टिळेकरवाडीसह भवरापूर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. टिळेकरवाडी येथील श्री दत्त सेवा ट्रस्टची स्थापना करण्यात भीमराव टिळेकर यांचा मोठा वाटा होता.
तसेच त्यांनी काही दिवस ट्रस्टचे अध्यक्षपदही भूषवले होते. यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी होती, यामुळे घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने त्यांच्या कुटूंबावरही मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.