पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा? रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला, व्हिडीओ व्हायरल

पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. कात्रज चौक ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गाजवळ भरदिवसा एका रिक्षाचालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तो शेअर करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ही घटना सोमवारी (१८ मे) सकाळी सव्वादहाच्या सुमारास दत्तनगर चौक परिसरात घडली. सुरज माणिक काळे (वय ३०, रा. कात्रज) या रिक्षाचालकावर जुन्या वादातून धारदार कोयत्याने हल्ला करण्यात आला. आरोपींनी त्याला घेरून वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन पुलाजवळ कोसळल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

माहितीनुसार, रिक्षा स्टँडवरील वर्चस्व आणि प्रवासी बसवण्याच्या कारणावरून संबंधित रिक्षाचालकांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून वाद सुरू होते. त्याच वादाचे रूपांतर अखेर रक्तरंजित हल्ल्यात झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

घटनेनंतर आंबेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली. बाळासाहेब भोसले, गणेश धारपाळे आणि गणेश ऊर्फ भावड्या धारपाळे अशी अटक आरोपींची नावे आहेत. जखमी सुरज काळे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.