Ticket Booking : ऑनलाईन बुक करता येणार नाही नातेवाईकांचे रेल्वे तिकिट, काय आहे सत्य?, IRCTC ने दिली महत्वाची माहिती…
Ticket Booking : सोशल मीडियावर रेल्वे तिकिट बुकिंग करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर रेल्वे तिकिट बुकिंग बाबत शेयर करण्यात येत असलेल्या माहितीमध्ये दावा केला जात आहे की, जर एखाद्या प्रवाशाचे आडनाव बुकिंग करणाऱ्या व्यक्तीच्या आडनावाच्या वेगळे असेल तर असे लोक एकत्र तिकिट बुक करू शकणार नाहीत.
परंतु ही माहिती चुकीची आहे आणि यावर आयआरसीटीसी ने दखल घेत योग्य माहिती दिली आहे.आयआरसीटीसीने एक्स पोस्टद्वारे सांगितले की, सोशल मीडियावर ई-तिकीट बुकिंगबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे.
या अफवा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. तुम्ही वेगवेगळी आडनावे असलेल्या व्यक्तींसाठी ट्रेनचे तिकिट बुक करू शकता. तुमच्या आयआरसीटीसी अकाऊंटद्वारे एकाचवेळी कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांसाठी तिकिट बुक करू शकता, जरी आडनाव वेगळे असले तरी.
दर महिन्याला बुक करू शकता एवढे तिकीट..
आयआरसीटीसीने म्हटले की, पहिल्या प्रमाणेच तुम्ही तुमच्या अकाऊंटमधून दर महिन्याला १२ तिकिट बुक करू शकता. जर आयआरसीटीसी अकाऊंट आधारसोबत जोडले असेल तर तुम्ही महिन्यात २४ तिकिट बुक करू शकता.
दरम्यान, आयआरसीटीसीने हे देखील सांगितले की, आपल्या पर्सनल आयडीचा वापर करून मित्र, कुटुंब आणि नातेवाईकांसाठी तिकिट बुक करू शकता. पर्सनल आयडीद्वारे बुक केलेली तिकिटे केवळ त्यांच्याच वापरासाठी आहेत. ती विकता येणार नाहीत.
जर ही तिकिटे विकण्याचा प्रयत्न केला तर ते बेकायदेशीर आहे आणि रेल्वे कायदा, १९८९ कलम १४३ अंतर्गत हा गुन्हा मानला जाईल. असे स्पष्ट करण्यात आले आहे.