मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची धमकी, धक्कादायक माहिती आली समोर…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भागलपूर दौरा सुरु असताना त्यांना मारण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. पाटण्यातील विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून मोदींना ठार मारण्याची धमकी देणारा मेसेज पोलिसांना प्राप्त झाला.

या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. तपासात आढळले की, हा मेसेज पंतप्रधानांवर नाही तर एका कौटुंबिक वादातून पाठवण्यात आला होता. या प्रकरणात बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील सुल्तानगंज येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तपासात त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. काकांना फसवण्यासाठीच आपण हा धमकी देणारा मेसेज पाठवल्याचे त्याने सांगितले आहे.
धमकीचा मेसेज भागलपूर पोलिसांना मिळताच त्यांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केले. हा मेसेज सुल्तानगंज महेशी गावातील मंटू चौधरी यांच्या मोबाईलवरून पाठवण्यात आला होता. मात्र, चौकशीत मंटू चौधरी यांचा यामध्ये काहीही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले. खरेतर, हा मेसेज त्यांचा पुतण्या समीरकुमार रंजन याने पाठवला होता.

दरम्यान, समीरकुमारने पोलिस अधिकाऱ्यांसह भागलपूर एसपींना देखील हा मेसेज पाठवला होता. त्याने फसवणूक करताना VPN प्रणालीचा वापर केला आणि आपल्या काकांचा मोबाईल फिंगरप्रिंटने अनलॉक करून त्यावरूनच मेसेज पाठवला. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली असून सखोल चौकशी सुरू आहे.