कुंजीरवाडी येथील ‘या’ अट्टल गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार
लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती आहे.
योगेश शांताराम लोंढे (वय 30 रा. कुंजीरवाडी माळवाडी, ता. हवेली) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी लोंढे हा नायगाव फाटा, कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, पुणे-सोलापूर रोड परिसरात दहशत निर्माण करुन नागरिकांना त्रास देत असायचा. अखेर पोलिसांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिले होते.
त्यानुसार, पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार योगेश लोंढे हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी त्याच्या साथीदारांच्या मदतीने सतत गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी योगेश लोंढे याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन परिमंडळ पाचचे पोलीस पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे पाठवला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.