Third Mumbai : आता तिसरी मुंबई करण्यास अखेर महायुतीकडून शिक्कामोर्तब, प्रकल्पाला मंजुरी…

Third Mumbai : मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरातील लोकसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रात तिसरी मुंबई उभारण्याच्या प्रयत्नात आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. अटल सेतूजवळ तब्बल १२४ गावांची मिळून तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे. तिसरी मुंबई उभारण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.

न्हावा-शिवडी सागरी सेतू अर्थात अटल सेतूने गती पकडल्यानंतर राज्याच्या विद्यमान महायुती सरकारने सिडकोचे पंख छाटून ‘नैना’ क्षेत्रातील ८० आणि खोपटा नवे शहर या क्षेत्रातील ३३, मुंबई महानगर प्रादेशिक योजनेतील दोन आणि रायगड प्रादेशिक योजनेतील नऊ गावांच्या ३२३.४४ चौरस किलोमीटर क्षेत्रात तिसरी मुंबई वसविण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अंमलात येण्यापूर्वीच ४ मार्च २०२४ रोजी याबाबतची अधिसूचना नगरविकास विभागाने प्रसिद्ध केली. मुंबई आणि नवी मुंबईसह रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या न्हावा-शेवा-शिवडी अटल सेतूमुळे परिसरात आर्थिक वृद्धीची मोठी संधी आहे.

तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच भागात आकारास येत असून, त्यामुळे येथील नियोजनबद्ध विकास करावयाचा आहे. त्यासाठीच खोपटासह ‘नैना’ क्षेत्रातील १२४ गावांतील ३२३.४४ चौरस किलोमीटर क्षेत्रात नवे शहर वसविणे गरजेचे असून, त्यासाठी एमएमआरडीएची नेमणूक केल्याचे नगरविकास विभागाने म्हटले आहे. Third Mumbai
‘नैना’ क्षेत्रातील ८० आणि खोपटा नवे शहर या क्षेत्रातील ३३ गावांत विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोस असलेले अधिकार अन्य एका अधिसूचनेद्वारे ४ मार्च २०२४ पासूनच नगरविकासने काढले आहेत. या क्षेत्रात राज्य शासनाची एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मात्र लागू राहणार आहे. त्यामुळे त्यात दिलेल्या वाढीव चटईक्षेत्राचा लाभ विकासकांना घेता येणार आहे.
नवीन शहर विकास प्राधिकरण (एनडीटीए) म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती केल्याने ४ मार्चपासून १२४ गावांतील ग्रामस्थांना त्यांच्या जमिनीचा विकास करण्याचे अधिकार संपले आहेत. त्यांना आता आपल्या जमिनीचा कुठल्याही प्रकारचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएची परवानगी लागणार आहे.