चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय!! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बीडमध्ये मोठं वक्तव्य, नेमकं घडलं काय?

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांना अनेक सल्ले दिले. बीडमध्ये दाखल होताच पोलीस अधिकाऱ्यांवर ते चांगलेच बरसले. यामुळे आज वातावरण तापले होते. अनेक गुन्हेगारांना देखील त्यांनी थेट इशाराच दिला आहे.
तसेच अजित पवार म्हणाले, जेवढा मोठा हार तेवढी भिती वाटते. त्यामुळे त्या हाराचा बोजा वाटतो. आई-बापाच्या आणि चुलत्याच्या कृपेने चांगलं चालंलय आमच, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेतला खोचक टोलाही लगावल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांनी प्रवक्त्यांना मोलाचा सल्ला दिला.
‘सगळ्यांनीच तोलून मापून बोललं पाहिजे. कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही, यासह होणारे सत्कार सोहळे, स्वागत आणि अस्वच्छतेवर देखील अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ‘कुठे काहीतरी खायचं आणि त्याचा कचरा तिथेच टाकायचं, असं करू नका असेही अजित पवार म्हणाले.
सत्काराला ज्या शाली देतात त्यातील कागद तसाच खाली, हार आणला की पिशवी खाली. मी ती पिशवी उचलतो. मला बघितलं की राहुद्या दादा. नका आणू शाली, टोप्या घालू नका, हार घालू नका नुसता नमस्कार मला प्रेमाचा वाटेल’, असं म्हणत अजित पवार यांनी मिश्कील वक्तव्य केलं. युवा संवाद मेळाव्यातील भाषणामधून अजित दादांनी कार्यकर्त्यांना, युवा नेत्यांनाही संबोधित केलं.
अनुभवाचे चार बोल ऐकवत अजित पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना काही कानपिचक्याही दिल्या. प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी काय काय करावे याच्या मार्गदर्शक सूचनाही अजित दादांनी दिल्या. तसेच युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण, व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करण्यासाठी युवकांचे संघटन नीट असलं पाहिजे.
काही लोक भेटले ते म्हणाले बीडमध्ये काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. त्यांनी केल्या. मला निवेदन दिलं, मी त्यांना समर्थन दिलं.अधिकाऱ्यांनी देखील योग्य काम केले पाहिजे, त्यांनी कोणाला पाठीशी घालू नये, जो कोणी चुकीचा वागत असेल त्याला सोडणार नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.