आनंदात मामाच्या गावाला निघाल्या अन् काळाने वाटेतच गाठलं; भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू..

बारामती : सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी मामाच्या गावाला निघालेल्या तीन भावंडांवर नियतीने क्रूर घाला घातला. निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

मृत मुलींची नावे सेजल ज्ञानेश्वर बोरडे (17) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोरडे (15) अशी आहेत. तर पवन ज्ञानेश्वर बोरडे (12) याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेने फलटण तालुक्यातील मुरूम गावासह संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम येथील ही तिन्ही भावंडे शनिवारी सायंकाळी इलेक्ट्रिक स्कुटीवरून बारामती तालुक्यातील मुर्टी येथे मामाच्या गावाला निघाली होती. चौधरवाडी फाटा परिसरात त्यांच्या स्कुटीची आयशर टेम्पोशी समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतरापर्यंत फरपटत नेल्याने दुर्घटनेची तीव्रता आणखी वाढली.

या अपघातात सेजल आणि अक्षरा यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या पवनला प्रथम बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही क्षणांपूर्वी आनंदाने मामाच्या गावाला निघालेल्या भावंडांपैकी दोन बहिणींना जीव गमवावा लागल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. से
जल बारावीत तर अक्षरा दहावीत शिक्षण घेत होती. दोघीही अभ्यासात हुशार असून भविष्यात एअर होस्टेस होण्याचे स्वप्न पाहत होत्या. मात्र एका क्षणात सर्व काही संपले आणि संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.