जिल्हा परिषदेचे बिगुल वाजणार! मतदानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात निवडणुका सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. यामुळे सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. असे असताना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे. मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकीकडं पाहिलं जातं. गेल्या अनेक दिवसांपासून हा निवडणुका लांबल्या आहेत. यामुळे या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
सुप्रीम कोर्टाने निवडणुकीसाठी मुदतवाढ दिल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते. आज राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. यामुळे यामध्ये नेमकी काय घोषणा होणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. अनेकदा ही निवडणूक लांबणीवर पडली आहे.

दरम्यान, आज महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपूर्वी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणे अपेक्षित होत्या. मात्र, ११ जानेवारीनंतरही जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आता २१ दिवसांत १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक मुदतीत होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
न्यायालयात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदांसह उर्वरित पंचायत समित्यांसंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यानंतर आयोग निवडणुकीचे नियोजन जाहीर करेल, असे सूत्रांनी सांगितले. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून कार्यकर्ते याबाबत उत्सुक आहेत.