महाराष्ट्रातील शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा संपली; शिक्षण विभागाने जाहीर केल्या तारखा…

मुंबई : महाराष्ट्रातील शाळा सुरू होण्याबाबत सुरू असलेल्या संभ्रमावर अखेर शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था नियोजित वेळेनुसार 15 जून 2026 पासून प्रत्यक्ष वर्गांसह सुरू होणार आहेत. शाळा उशिरा सुरू होणार, ऑनलाइन शिक्षण दिले जाणार किंवा वेळापत्रक बदलले जाणार अशा सर्व अफवांना शासनाने पूर्णविराम दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढते तापमान आणि हवामान बदलामुळे शाळा सुरू होण्याची तारीख पुढे ढकलली जाईल, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि पूर्वनियोजित वेळापत्रकच लागू राहणार आहे.
कोरोना काळानंतर ऑनलाइन शिक्षणाचा अनुभव लक्षात घेता यंदाही ऑनलाइन वर्ग सुरू होतील, असा समज काही पालकांमध्ये निर्माण झाला होता. मात्र हा समजही चुकीचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे विभागाने सांगितले आहे.

विदर्भातील वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विशेष वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. 15 जून ते 29 जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळी 7 ते 11.45 या वेळेत भरविण्यात येतील. 30 जूननंतर मात्र सर्वत्र नियमित वेळापत्रक लागू होईल.

दरम्यान, काही भागांतील तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने काही पालक संघटनांनी शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
तरीही सध्या शिक्षण विभागाचा आदेश कायम असून कोणताही नवीन बदल जाहीर झालेला नाही. नागरिकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहिती केवळ शासनाच्या अधिकृत माध्यमांतूनच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.