दोघांची इन्स्टावर ओळख, समलैंगिक संबंध! सतीश विवाहित असल्याचं समजताच सूरजचा संताप अनावर; गाडीतच गळा चिरून मित्राची हत्या


गडचिरोली : इन्स्टाग्रामवर झालेली ओळख, त्यानंतर फुललेले समलैंगिक संबंध आणि पुढे निर्माण झालेला वाद… या सगळ्याचा शेवट एका थरारक हत्याकांडात झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. लग्न करण्याच्या इच्छेने नात्यात असलेल्या एका तरुणाने, समोरचा तरुण आधीच विवाहित असल्याचे समजल्यानंतर संतापाच्या भरात त्याची गाडीतच हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे गडचिरोलीसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ रविवारी पहाटे घडली. सूरज हलदार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सतीशकुमार निसाद असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीशकुमार निसाद हा अहेरीजवळील नागेपल्ली गावातील रहिवासी होता. तो गॅरेज व्यवसाय करत होता. तर आरोपी सूरज हलदार हा ओडिशा राज्यातील नबरंगपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. सोशल मीडियावरील संवादातून दोघांमध्ये मैत्री वाढली आणि पुढे त्यांचे समलैंगिक संबंध निर्माण झाले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सूरजला सतीशकुमारसोबत आयुष्य घालवायचे होते आणि त्याने लग्नाचीही इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काही काळानंतर सतीशकुमार हा आधीच विवाहित असल्याचे सूरजला समजले. ही बाब समोर आल्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. सतीशकुमारने लग्नास स्पष्ट नकार दिल्याने सूरजच्या मनात नाराजी आणि संताप वाढत गेला.

घटनेच्या दोन दिवस आधी सूरज ओडिशाहून थेट नागेपल्ली येथे सतीशकुमारला भेटण्यासाठी आला होता. दोघांनी काही वेळ एकत्र घालवला. त्यानंतर रविवारी पहाटे सतीशकुमार सूरजला परत ओडिशात सोडण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनातून निघाला. एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ पोहोचल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा लग्न आणि वैवाहिक आयुष्याच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला.

वाद इतका वाढला की संतापलेल्या सूरजने आपल्याजवळ असलेला धारदार चाकू काढला आणि सतीशकुमारवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या सतीशकुमारला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. त्यानंतर सूरजने त्याचा गळा चिरल्याचा आरोप असून गाडीतच सतीशकुमारचा मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार होण्याच्या तयारीत होता. मात्र त्याचा संशयास्पद वावर पाहून स्थानिक नागरिक सतर्क झाले. त्यांनी तात्काळ त्याला पकडून ठेवले आणि पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच हालेवारा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले.

सध्या सूरज हलदार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दोघांमधील सोशल मीडिया संवाद, कॉल रेकॉर्ड आणि नात्याशी संबंधित इतर बाबींचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियावरून निर्माण झालेल्या नात्याचा असा रक्तरंजित शेवट झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!