अजित पवारांना मिळणार असंही गिफ्ट ! सांगलीतील लाडकी बहीण बांधणार सोन्याची राखी …..
Ajit Pawar : महाराष्ट्र सरकारच्या “माझी लाडकी बहीण” या योजनेचा पुण्यात भव्य शुभारंभ शनिवारी झाला. या योजनेत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर, राज्यातील अनेक पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये जमा करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील महिलांनी या योजनेमुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोन्याची राखी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीतील महिलांनी वर्गणी गोळा करून तीन ग्रॅम सोन्याची राखी तयार केली आहे. ही राखी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ही राखी अजित पवार यांना बांधण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन वंदना मोरे आणि अश्विनी चेंडके यांनी केले आहे. वंदना मोरे म्हणाल्या, “भावाने आपल्यासाठी खूप काही केले आहे, त्यामुळे त्याला एक खास रिटर्न गिफ्ट देण्याचा विचार करून आम्ही ही राखी तयार केली आहे.
दरम्यान, यवतमाळच्या आर्णी तालुक्यात “माझी लाडकी बहीण” योजनेचे 3 हजार रुपये अनवधानाने एका तरुणाच्या खात्यात जमा झाले. जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या बँक ऑफ बडोदा बँकेत हे पैसे जमा झाले होते, त्याने कोणताही अर्ज भरलेला नसताना हा प्रकार घडला. सरकारने याची दखल घेऊन तत्काळ सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.