विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर; २ नोव्हेंबरपासून शाळांना सुट्टी, ‘या’ दिवशी पुन्हा भरणार वर्ग..

पुणे : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या सत्राबाबत आणि विविध सुट्ट्यांबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीची दीर्घ सुट्टी २ नोव्हेंबर २०२६ पासून मिळणार असून, सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.

माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सत्रांची रचना स्पष्ट करण्यात आली आहे. या परिपत्रकानुसार चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र हे सोमवार, १५ जून २०२६ पासून सुरू झाले असून ते शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राहील.
दिवाळी सुट्टीचा कालावधी


विद्यार्थी व शिक्षकांसाठी दिवाळीची सुट्टी सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ ते शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राहील. या कालावधीत दिवाळी सणाचे विविध दिवस जसे की धनत्रयोदशी (६ नोव्हेंबर), दिवाळी पाडवा/बलिप्रतिपदा (१० नोव्हेंबर) आणि भाऊबीज (११ नोव्हेंबर) या सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
शाळा पुन्हा कधी सुरू होणार?
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पुन्हा सुरू होतील आणि येथून द्वितीय सत्राला सुरुवात होईल. द्वितीय सत्र हे १६ नोव्हेंबर २०२६ ते शनिवार, १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर सोमवार, ३ मे २०२७ ते सोमवार, १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी राहील.
सुट्ट्यांबाबत महत्त्वाच्या सूचना
माध्यमिक शाळा संहितेनुसार संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.
कामाचे दिवस: शैक्षणिक वर्षात शाळांचे एकूण कामाचे दिवस किमान २३० असणे आवश्यक आहे.
स्थानिक सुट्ट्यांचे समायोजन: गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांसाठी दिवाळी किंवा उन्हाळ्याची सुट्टी कमी करून समायोजन करायचे असल्यास शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील.
बदल न करण्याचे आदेश: शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात शाळा स्तरावर परस्पर कोणताही बदल करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या या परिपत्रकामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.
