मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, महाराष्ट्रातून येत्या दोन दिवसांत पाऊस माघारी फिरणार, IMD चा अंदाज, जाणून घ्या कसे राहणार हवामान..

पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात पावसाने पूर परिस्थिती निर्माण केली. नंतर अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळ सक्रिय झाल्याने पावसाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुक्काम वाढवला. आता राज्यातून मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसात राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास पार पडेल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या परतीची रेषा अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी आणि रक्सौल या मार्गांमधून जात आहे. म्हणजेच राज्यातील विविध भागातून हळूहळू मान्सून माघारी फिरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मान्सूनचा पाऊस हळूहळू कमी होत असल्याचे दिसून आले आहे. हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार मान्सूनच्या परतीच्या या प्रवासामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अजूनही होऊ शकतो.
परंतु एकूणच राज्यात हवामान उबदार आणि आर्द्रता कमी होण्यास सुरुवात होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या आठवड्यात तयार झालेल्या शक्ती चक्री वादळाची तीव्रता कमी झाली आहे .त्यामुळे कमी दाबाचा पट्टा विरला आहे .
यंदा ठरलेल्या वेळेच्या आठवडाभर आधीच सुरू झालेला नैऋत्य मौसमी पाऊस २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर दोन आठवडे आधीच तो महाराष्ट्रात पोहोचला.
जून आणि जुलै महिन्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होतं मात्र ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरात झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रात तयार झालेले शक्ती चक्रीवादळ यामुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबला होता. आता हवामान विभागाने परतीचा पाऊस लवकरच सुरू होईल असा अंदाज वर्तवला आहे.
गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमधून पुढील 24 तासात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातून मान्सून माघारी फिरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढील पाच दिवस राज्यभरात कोणत्याही जिल्ह्यात पावसाचे अलर्ट देण्यात आलेले नाहीत. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार आहे.