जमाबंदी विभागाने शेतजमिनीशी माहिती एका क्लिक योजनेद्वारे नागरीकापर्यंत पोहचवावी – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता माहे जुलैअखेर जिल्हानिहाय लोकअदालतीचे आयोजन करावे, त्याचबरोबर नागरिकांना शेतजमिनीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्याकरीता याबाबत इतर राज्याच्या प्रणालीचा अभ्यास करावा, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
नवीन प्रशासकीय इमारत येथे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, उपसंचालक कमलाकर हटेकर, राजेंद्र गोळे, सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.
चंद्रशेखर बाबनकुळे म्हणाले, राज्यातील समुद्र व खाडी किनारपट्टीवरील महसूली सीमा व उच्चतम भरती रेषेपर्यंतच्या जमिनीचे सर्वेक्षण व मोजणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभाग, महसूल प्रशासन, मेरीटाईम बोर्ड, वनविभाग, कांदळवन संरक्षण विभाग आदींच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करावी. मोजणी प्रक्रियेमध्ये सुटसुटीतपणा आणून नागरिकांना सुलभ सेवा देण्याकरीता प्रयत्न करावे. स्वामित्व योजनेअंतर्गत येणारी प्रकरणे बारकाईने हाताळून मार्गी लावावेत. योजनेअंतर्गत येणाऱ्या मालमत्तापत्रकांवर बँकेने कर्ज देण्याकरीता पुढे यावे. नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही करावी.
विभागाच्या आकृतीबंधाबाबत मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन करावे. विभागातील रिक्तपदे भरण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. मंत्रालयीन स्तरावरील प्रकरणांचा पाठपुरावा करुन ते मार्गी लावण्याकरीता एका समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. राज्य शासनाच्या १५० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत विभागनिहाय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. राज्य शासन गतीमान पद्धतीने कामे करीत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजात गतिमानता आण्यासोबतच पारदर्शक पद्धतीने कामे करावीत, असेही श्री. बावनकुळे म्हणाले.
डॉ.सुहास दिवसे म्हणाले, गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजनेअंतर्गत ३० हजार ४२२ गावे समाविष्ट असून त्यापैकी १८ हजार २८३ गावांचे मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहेत. माहे जून २०२५ ते माहे मे २०२६ पर्यंत प्रती महिना सुमारे १ हजार याप्रमाणे स्वामित्व योजना पूर्ण करण्याबाबत लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ३० भु-प्रणाम केंद्राचे लोकार्पण करण्यात आले असून येत्या काळात दुसऱ्या टप्प्यात ३५ भु-प्रणाम केंद्राचे लोकार्पण करण्याचा मानस आहे.