वीज कोसळून अख्ख शेतकरी कुटुंब ठार, घटनेने राज्य हळहळल…!

देसाईगंज : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. आता तालुक्यात वीज कोसळून अख्खं शेतकरी कुटुंबच ठार झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील वडसा-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरी जवळ घडली.
या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले आहे. राजगडे कुटुंब गरगळा येथून लग्न लावून येत असताना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात झाली. लगेच विजांचा कडकडाट सुरू झाला.
वीज कडाडत असल्याने राजगडे कुटुंबाने दूध डेअरी जवळ एका झाडाखाली आश्रय घेतला. असे असताना अचानक वीज अंगावर कोसळल्याने कुटुंबातील चारही जण जागीच ठार झाले. देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र ते मृत्युमुखी पडले होते.
भारत लक्ष्मण राजगडे रा. आमगाव, ता. देसाईगंज, त्यांची पत्नी अंकिता राजगडे हे दोघेही पती-पत्नी आपल्या दिव्यांशी व मनस्वी या कोवळ्या लेकरांसह मृत्यूमुखी पडले. पुढील तपास पोलिस निरीक्षक रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.