हवेली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला; हवेलीत सहकारातील गत प्रतिष्ठा पाहता निवडणूकीत गट -तटाची प्रतिष्ठा लागणार पणाला..

उरुळीकांचन : मतदार यादीच्या हरकतीवरुन मुंबई उच्च न्यायालयापर्यंत ताणलेल्या हवेली तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुक अखेर सहकार विभागाने जाहीर केली असून २१ नोव्हेंबर रोजी या संस्थेची मतदान प्रक्रिया पार पडत असून उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज पासून १९ ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. संस्थेला ‘अर्थिक’ पुर्नवैभव लाभून कोट्यवधींच्या ठेवी व मालमत्ता ,पुणे मार्केयार्ड स्थित असलेल्या या संस्थेवर आपली राजकीय प्रतिष्ठा दाखविण्यासाठी तालुक्यात दोन गट या संस्थेवर झुंझणार असून पुणे जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत रंगीत तालिम पाहण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

हवेली तालुक्यात सहकार संस्थेची महत्त्वाची संस्था म्हणून पुणे बाजार समिती, यशवंत कारखान्यानंतर हवेली तालुका खरेदी विक्री संघ म्हणून ओळखला जात असून संस्थेवर आपल्या समर्थकांची वर्णी लावून आपले राजकीय प्राबल्य कायम ठेवावे म्हणून या ठिकाणी प्रयत्न झाले आहे.संस्थेच्या स्थापनेनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, यशवंत सहकारी साखर कारखाना व पुणे बाजार समितीसाठी समर्थकांचे जाळे विणण्यासाठी या संस्थेचा उपयोग झाला असला तरी आता तालुक्यातील बदलती राजकीय समीकरणे संघावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ लागल्याने संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहे.
पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्यावर गेली २३ वर्षानंतर प्रशासकीय राजवट उठविल्या नंतर हवेली तालुक्यात सहकार क्षेत्राला गती येऊ लागली असून संस्थेवर आपले राजकीय प्राबल्य प्रस्थापित करण्यासहीत पदातून आपली राजकीय इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी तालुक्यात आपली पूर्ण कसब पणाला लागली आहे. पदासाठी गटातटाचे एक विचित्र समीकरण तालुक्यात रंगले असून ‘कालचा शत्रू आजचा मित्र ‘ बनून आपली राजकीय पोळी भाजण्यात दंग आहेत.


हवेली तालुक्यात पुणे बाजार समिती व यशवंत कारखान्याचे काटशहाचे राजकारण खरेदी विक्री संघावर उमटणार असून पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी या संस्थेची रंगीत तालीम निश्चित आहे. या संघावर हवेली तालुका सहकार निबंधक कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या मतदार यादीनुसार तालुका कृषी पणन संस्था ९३ मतदार तर प्रतिनिधी सभासद २१० मतदार अशा एकूण १९ जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत -१९ /१०/२०२६ ते २६ /१०/२०२६ छाननी २७ /१०/२०२६ नामनिर्देशन पत्र माघार मुदत १२ /११/२०२६ तर २१ /१०/२०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
