महिलेचा फेसबुक कॉल पडला महागात! तोतया सायबर पोलिसांनी घातला ‘एवढ्या’ हजारांचा गंडा, वारजे माळवाडी येथील घटना…

पुणे : फेसबुक अकाऊंटवरुन महिलेने कॉल करुन त्याला बोलावून घेतले. महिलेच्या या कॉलला भुलून तो पुण्यात आला. तेव्हा तोतया सायबर पोलिसांनी मुलींना ट्रॅप करतो, अशी धमकी देऊन त्याला लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार वारजे माळवाडी येथील स्वर्णा हॉटेल येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला.
याप्रकरणी रावेत येथील एका ४६ वर्षाच्या गृहस्थाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फेसबुक अकाऊंटधारक महिला व दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादीच्या फेसबुक अकाऊंटवर मनिषा जी असे सांगणार्या महिलेने संपर्क साधला. त्यांना या महिलेने फेसबुक कॉल करुन वारजे माळवाडी येथील स्वर्णा हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्याप्रमाणे फिर्यादी तेथे गेले. तेव्हा मनिषा जी या महिलेऐवजी दोघे जण त्यांच्याजवळ आले.
आम्ही सायबर पोलीस असून तू मुलींना ट्रॅप करतो, त्यांचे व्हिडिओ काढतो, हे आम्हाला चेक करायचे आहे, आमच्याबरोबर चौकीला चल असे म्हणून त्यांना वारजे माळवाडी येथील एच डी एफसी बँकेच्या एटीएममध्ये आणले.
दरम्यान, तेथे त्यांना ५३ हजार ५०० रुपये काढायला भाग पाडले. हे पैसे घेऊन दोघे पळून गेले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक ओलेकर तपास करीत आहेत.