धनलाभ व्हावा, मुलाचे भले व्हावे म्हणून जन्मदात्या आईचे निर्दयी कृत्य, मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतलं अन्..

छत्रपती संभाजीनगर : मुलाचे भले व्हावे, धनलाभ व्हावा यासाठी जन्मदात्या आईने पोटच्या २० वर्षीय मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला.
ही घटना गुरुवारी (ता.१७) रोजी साडेपाच वाजता फुलेनगर आंबेडकर नगर भागात घडली. दरम्यान, याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्वती दादासाहेब हुलमूख (वय ४०, राहणार गल्ली क्रमांक एक फुलेनगर आंबेडकर नगर) असे मुलीचा नरबळी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईचेनाव आहे. तर, शकुंतला अहिर राहणार मिसरवाडी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी २० वर्षीय मुलीचे फिर्याद दिली आहे
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित मुलीचे वडिलांचं बारा वर्षांपूर्वी निधन झालं. ती तिच्या आई आणि भावासोबत आंबेडकर नगर परिसरामध्ये राहते. तिची आई पार्वतीचा गेल्या काही दिवसांपूर्वी जादूटोण्याचा प्रयोग करणाऱ्या शकुंतला अहिरशी संपर्क झाला.
यावेळी तुझ्या मुलाचे भले करायचा असेल आणि तुला धनलाभ करून घ्यायचा असेल, तर तुला तुझ्या मुलीला जिवंत मारून टाकावे लागेल, असे शकुंतलाने पार्वतीला सांगितले.
दरम्यान, बुधवारी (ता.१६) ऑगस्ट रोजी रात्री मुलगी घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या कुलीमध्ये एकटी झोपलेली होती. तिची आई आणि भाऊ खालच्या मजल्यावर झोपलेले होते. यावेळी गुरुवारी (ता.१७) रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास तिची आई वरच्या मजल्यावर आली आणि मुलीच्या अंथरुणावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केली. त्यानंतर ती खाली आली.
आईने पेट्रोल ओतून पेटवताच मुलीला जाग आली, तिने पटकन अंगावरील गोधडी फेकून दिली आणि आरडाओरड करत खाली आली. यावेळी तिची आई खालीच होती मात्र तिने कुठलीच मदत केली नाही. तर ज्या भावासाठी आईने हे सारे केले, त्याच भावाने स्वत:च्या अंगावरील गोधडीने बहिणीच्या अंगाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचं ठरवलं. मात्र, तिची आई पार्वती ही तिला पोलिसांत तक्रार देण्यास नकार देत होती.
दरम्यान, आई सोमवारी (ता.२१) रोजी घराबाहेर गेली असता तिने सिडको पोलिस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना संपूर्ण हकीकत सांगितली. यावेळी पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करुन तिच्या फिर्यादीवरून आई पार्वती आणि शकुंतला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.