घशाला सूज, डॉक्टरांचा ‘व्हॉईस रेस्ट’चा सल्ला; सुप्रिया सुळे काही दिवस भाषणांपासून दूर, ट्विटमधून दिली माहिती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुढील काही दिवस सार्वजनिक भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार आहेत. घशात सूज आढळल्याने प्रसिद्ध ईएनटी तज्ज्ञ डॉ. मिलिंद किर्तणे यांनी त्यांना पूर्णपणे आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली असून, त्यांच्या प्रकृतीबाबतची ही माहिती समोर आल्यानंतर कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सार्वजनिक कार्यक्रम, पत्रकार परिषद, संसदीय भूमिका आणि विविध सामाजिक-राजकीय विषयांवर सातत्याने आपली भूमिका मांडणाऱ्या सुप्रिया सुळे या नेहमीच सक्रिय असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून घशाचा त्रास जाणवत असल्याने त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणीनंतर त्यांच्या घशात सौम्य स्वरूपाची सूज असल्याचे निदान करण्यात आले.
याबाबत एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “आज मी घसा आणि आवाजाच्या तपासणीसाठी डॉ. मिलिंद किर्तणे यांची भेट घेतली. तपासणीनंतर त्यांनी घशात थोडी सूज असल्याचे सांगितले असून पूर्णपणे व्हॉईस रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. पुढील एक ते दोन आठवडे मी व्हॉईस थेरपी घेणार असून भाषणे, मुलाखती आणि जास्त वेळ बोलणे टाळणार आहे. सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद.”

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या पुढील काही दिवस नियोजित सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मर्यादित सहभाग घेण्याची शक्यता आहे. विशेषतः मोठ्या सभा, पत्रकारांशी संवाद आणि दीर्घकाळ चालणाऱ्या बैठका टाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या काही राजकीय कार्यक्रमांच्या वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या पोस्टच्या एक दिवस आधी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडली होती. देशाला सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाची गरज असल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली होती.
त्याचबरोबर हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि NEET परीक्षेच्या विश्वासार्हतेशी संबंधित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारने विद्यार्थ्यांशी संवेदनशीलतेने संवाद साधण्याची गरज असल्याचे नमूद करत, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे त्यांनी म्हटले होते. विद्यार्थ्यांचा आवाज संसदेसह प्रत्येक योग्य व्यासपीठावर मांडत राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली होती.
आता मात्र डॉक्टरांच्या सूचनेनुसार सुप्रिया सुळे काही दिवस आरोग्याला प्राधान्य देणार असून, आवश्यक उपचारांसह व्हॉईस थेरपी घेणार आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.