Sunil Tingre : पुण्यातील अपघाताच्या घटनेवर आमदार सुनील टिंगरे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, पोलिसांवर….

Sunil Tingre : पुण्यात झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कल्याणीनगरमधील अपघात घडल्यावर आपले परिचित विशाल अगरवाल यांचा फोन आल्याने आपण पहाटे 3 वाजता येरवडा पोलीस ठाण्यात गेलो होतो, पण पोलिसांवर कोणताही दबाव टाकला नसल्याचं आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
या घटनेची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आपण कायद्यानुसार कारवाई करावी अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचे सुनील टिंगले यांनी सांगितलं. पुण्यातील बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी आमदाराने हस्तक्षेप केल्याचा आरोप करत सामाजित कार्यकर्त्या विनिता देशमुखांनी आमदार सुनील टिंगरेंकडे बोट दाखवलं होतं. त्यावर सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
कल्याणीनगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो. Sunil Tingre
या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे.
याबाबत सुरवातीला दुर्लक्ष केलं परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. असे सुनील टिंगरे म्हणाले