सुनेत्रा पवारांची देशातील सर्वोच्च मताधिक्याकडे वाटचाल; नव्या फेरीनंतर 78 हजारांची आघाडी

बारामती : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सध्या वेग आला आहे. या निवडणुकीत त्यांची पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्याने निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बारामतीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी सुरू असून आतापर्यंत आठ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या फेऱ्यांमध्ये सुनेत्रा पवार यांना तब्बल 78,528 मते मिळाली आहेत. तर उर्वरित 23 उमेदवार आणि NOTA मिळून केवळ 1,425 मते मिळाल्याचे समोर आले आहे.
सध्याच्या कलानुसार, सुनेत्रा पवार या देशातील विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आतापर्यंत देशातील सर्वोच्च मताधिक्याचा विक्रम 2,14,128 मतांचा असून, बारामतीतील मतदार मोठ्या फरकाने मतदान करत असल्याने हा विक्रम मोडला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, यावेळी सुरुवातीपासूनच देशातील सर्वोच्च मताधिक्याचा विक्रम करायचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहायची अशा स्वरूपाची मतदारांमध्ये चर्चा सुरू होती आणि मतदानामध्ये देखील तेच दिसून आले आहे. अनेक मतदान केंद्रावर पैकीच्या पैकी मते सुनेत्रा पवार यांना मिळालेले दिसून येत आहेत
