मुंबई जिंकण्यासाठी डावपेच ; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वाची बैठक, शिंदे-पवारांना दणका?

.मुंबई : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच नवी मुंबईतील विमानतळाचे उद्घाटन केले आहे. असे असतानाच आता राजधानी मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्वभूमीवर मुंबई जिंकण्यासाठी भाजपाच्या गोटात पडद्यामागे मोठ्या हालचाली होत असून आता मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपाच्या मुंबईतील सर्व आमदार आणि खासदारांची एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे आमदार आणि खासदार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. आज (8 ऑक्टोबर) रात्री आठ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत मोदी आमदार, खासदारांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. या बैठकीचा नेमका विषय समजू शकलेला नाही. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित राहणार आहेत. सोबतच मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम हेदेखील या बैठकीला उपस्थित असतील. आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत मोठी रणनीती ठरली तर आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवारांना मोठा दणका बसणार आहे.
मुंबई जिंकण्यासाठी डावपेच
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढवणार आहेत. महायुती म्हणून ते महाविकास आघाडीला सामोरे जाणार आहेत. या निवडणुकीत मुंबईची महापालिका सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे. मुंबईवरील ठाकरेंचे वर्चस्व कमी करण्यासाठी काहीही झालं तरी मुंबई पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून डावपेच आखले जात आहेत. एकनाथ शिंदे यांनीदेखील या निवडणुकीसाठी आपली ताकद लावलेली आहे. असे असताना आता नरेंद्र मोदी मुंबईतले भाजपाचे आमदार आणि खासदार यांच्याशी बोलणार आहेत. त्यामुळे आता या बैठकीतून नेमके काय समोर येईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे