पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ! अजित पवार गटाच्या २ नगरसेवकांसह ११ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?


पुणे : पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) दोन विद्यमान नगरसेवकांसह सुमारे १० ते ११ जणांविरोधात पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अभ्यासिका आणि ग्रंथालयात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्यासह साहित्याचे नुकसान आणि चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच या घटनेची विचारणा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचाही आरोप आहे.

कोण आहेत गुन्हा दाखल झालेले नगरसेवक?

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक सुरज लोखंडे आणि नगरसेविका प्रिया गदादे पाटील यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ताधारी पक्षातील विद्यमान नगरसेवकांवर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्याने पुण्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील एका अभ्यासिका आणि ग्रंथालयात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. संबंधित नगरसेवक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या ठिकाणी प्रवेश केला. त्यानंतर अभ्यासिका आणि ग्रंथालयातील साहित्याची तोडफोड करून नुकसान करण्यात आले, तसेच काही साहित्य चोरीला गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी संबंधित ठिकाणी गेले असता, आरोपींनी सर्वांसमक्ष त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि अपमानित केले, असा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

पर्वती पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, अनधिकृत प्रवेश आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपांशी संबंधित विविध कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पर्वती पोलीस करत आहेत. संबंधित आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असून, प्रकरणातील पुढील घडामोडींकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!