Srinivas Pawar : बारामती शरद पवारांचीच! अजित पवारांच्या भावाचा दादांना टोला, नेमकं काय म्हणाले?

Srinivas Pawar : राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान दिले होते. शरद पवार यांच्या बारामती येथून पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून शरद पवार यांच्या विरोधात दंड थोपटले होते.
महाराष्ट्रात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केवळ एक खासदार निवडून आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चार जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र त्यापैकी एकाच जागेवर अजित पवार गटाला यश मिळालं.
बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. प्रतिष्ठेच्या या लढाईत संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिले. तर एकटं पाडल्याचा दावा करत अजित पवारांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने मतदान केले. या निवडणुकीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. निवडणुकीत अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात प्रचार केला. निकालानंतर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. Srinivas Pawar
काल खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या विजयानंतर आता अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्यासोबत येणार अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, यावर श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे आले तर परत घेणार का? असा प्रश्न श्रीनिवास पवार यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, शेवटी शरद पवार आणि सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे तो निर्णय घेतील. पक्ष तो निर्णय घेईल.
त्यांचा काल पराभव झाला तेव्हा आम्हाला वाईट वाटले. सुप्रिया आणि मी काल यावर बोललो आहे. शेवटी तो माझा भाऊ आहे, आम्ही त्याच्याकडे आदराने बघितले आहे. पण त्याचे काही निर्णय चुकायला लागले तेव्हा आम्ही त्याला बोलून बघितलं. जे योग्य सुरु आहे ते पाहून त्याचे वाईट वाटत होतं. मी बोलून बघितलं पण त्यांनी ऐकले नाही, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली, पण बारामती ही शरद पवारांची आहे हे सिद्ध झाले आहे .
राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं असतं, त्यामुळे कौटुंबिक पातळीवर आम्ही एक आहोत आणि आमचे कुटुंब प्रमुख शरद पवारचं आहेत, अशी भूमिका श्रीनिवास पवार यांनी मांडली. अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. बारामतीकरांनी मुलीला १ लाख ५३ हजार मतांची भेट दिली आहे, असंही ते सांगायला विसरले नाहीत.