आषाढी वारीसाठी रेल्वेची खास तयारी! मराठवाड्यातून पंढरपूरला धावणार स्पेशल ट्रेन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होतात. या काळात रेल्वेवर मोठा ताण येत असल्याने मध्य रेल्वेने भाविकांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर, नागरसोल, आदिलाबाद, मिरज आणि अकोला येथून पंढरपूरसाठी विशेष गाड्या धावणार असून मराठवाड्यातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लातूर–पंढरपूर विशेष रेल्वे

आषाढी वारीनिमित्त 24, 27, 28 आणि 29 जुलै रोजी सकाळी 7 वाजता लातूरहून विशेष रेल्वे सुटेल. ही गाडी मुरूड, धाराशिव, बार्शी, कुर्डुवाडी आणि मोडनिंब मार्गे पंढरपूरला पोहोचेल.
नागरसोल–पंढरपूर विशेष गाडी (07631)

24 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता नागरसोलहून सुटणारी ही गाडी रोटेगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, परळी वैजनाथ, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी मार्गे 25 जुलै रोजी दुपारी 12.50 वाजता पंढरपूरला पोहोचेल.

पंढरपूर–जालना विशेष गाडी (07632)
25 जुलै रोजी रात्री 8 वाजता पंढरपूरहून सुटणारी ही गाडी कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, परळी वैजनाथ, परभणी, जालना मार्गे 26 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता जालन्यात पोहोचेल.
आदिलाबाद–पंढरपूर–मिरज विशेष गाडी (07633)
24 जुलै रोजी सकाळी 5 वाजता आदिलाबादहून सुटणारी ही गाडी नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, मोडनिंब मार्गे 25 जुलै रोजी रात्री 9.40 वाजता पंढरपूरला पोहोचेल. त्यानंतर सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ मार्गे रात्री 11.55 वाजता मिरज येथे पोहोचेल.
मिरज–पंढरपूर–आदिलाबाद विशेष गाडी (07634)
25 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता मिरजहून सुटणारी ही गाडी 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजता आदिलाबाद येथे पोहोचेल.
अकोला–पंढरपूर विशेष गाडी (07635/07636)
24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अकोलाहून सुटणारी विशेष गाडी 25 जुलै रोजी सकाळी 9.20 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची 07636 विशेष गाडी 25 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता पंढरपूरहून सुटून 26 जुलै रोजी दुपारी 4.50 वाजता अकोला येथे पोहोचेल.
रेल्वे प्रशासनाने आषाढी वारीसाठी प्रवास करणाऱ्या भाविकांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.