सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर..

मुंबई : बॉलिवूडचा ‘मसिहा’ अभिनेता सोनू सूद गरिबांना मदत केल्यामुळे सतत चर्चेत असतो. पण यावेळी त्याच्या कुटुंबाकडून वाईट बातमी येत आहे. अचानक सोनू सूदवर संकटांचा डोंगर कोसळला आहे.
सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद हिचा समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अपघात मुंबई नागपूर महामार्गावर घडला. अभिनेत्याचे सर्व चाहते काळजीत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कार अपघातात सोनाली आणि तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या तिच्या बहिणीच्या मुलाला दुखापत झाली आहे. सध्या दोघांवरही नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी कारमध्ये सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा आणि एक महिला देखील होती. नागपूरच्या दिशेने ते प्रवास करत होते. समृद्धी महामार्गावर त्यांच्या गाडीची अचानक धडक झाली.
जोरदार धक्क्यामुळे कारचा पुढील भाग पूर्णतः नुकसानग्रस्त झाला आहे. स्थानिक नागरिक आणि महामार्ग सुरक्षा पथकाने तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनाली सूदची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले असून, अपघात कशामुळे घडला, याचा तपास सुरू आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला की तांत्रिक बिघाडामुळे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
अभिनेता सोनू सूद आपल्या पत्नीच्या अपघाताच्या वृत्तावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सोनू सूद हा केवळ एक अभिनेता नसून, सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक मजुरांना मदत केल्यानंतर त्याला ‘रिअल लाईफ हिरो’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याची पत्नी सोनालीही प्रसिद्ध चित्रपट निर्माती असून, ती जास्तीत जास्त लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.