शिलाँगहून बेपत्ता झालेली सोनम अखेर सापडली, राजा रघुवंशी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर…

Raja Raghuvanshi Murder Case: मेघालयच्या शिलाँग शहरात हनिमूनसाठी गेलेलं इंदूरचं एक नवविवाहित जोडपं अचानक बेपत्ता झालं होतं. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला, जेव्हा राजा रघुवंशीचा मृतदेह डोंगरावर आढळून आला आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी गायब असल्याचं स्पष्ट झाले.
या प्रकरणाला आता नाट्यमय वळण लागले आहे. राजा रघुवंशी यांचा मृतदेह मेघालयमधील एका दरीत २ जून २०२५ रोजी सापडला होता, ज्याची पोलीस हत्येच्या दिशेने चौकशी करत आहेत. दरम्यान, बेपत्ता असलेली सोनम आता उत्तर प्रदेशात सापडली आहे.
काल रात्री उशिरा सोनमने तिचा भाऊ गोविंदला फोन करून याबाबत माहिती दिली. मात्र, त्यानंतर सोनमने सरेंडर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी त्याने हत्येची कबुली दिली.
मेघालयचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि गाझीपूरचे अॅडिशनल एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम हिने स्वतः आत्मसमर्पण केलं असून तिच्या अटकेने संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून सोनमने पती राजाची हत्या करण्यासाठी गुन्हेगारांची मदत घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
राजा आणि सोनमने लग्न केलं होतं. लग्नानंतर हे जोडपं मेघालयच्या शिलाँगला हनिमूनसाठी गेले होते. दरम्यान, त्यांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला भेट दिली होती. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले आणि काही दिवसांनी राजाचा मृतदेह टेकडीवर आढळला.
तपासाअंती समोर आलं की, सोनमनेच राजाला संपवण्यासाठी मध्यप्रदेशातील तीन गुन्हेगारांना कामावर ठेवले होते. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. तर सोनमने गाझीपूर येथे आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिला वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तिच्यावर पुढील चौकशी सुरू आहे.