सोलापुरामध्ये लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण…!

सोलापूर : सोलापूर शहरात एका मुस्लिम तरुणास एका टोळक्याने लव जिहादचा संशय घेत बेदम मारहाण केली आहे. ही घटना १ मार्च २०२३ रोजी सोलापुरातील एम्प्लॉयमेंट चौक परिसरात घडली. मुजाहिद पठाण (वय ३० वर्ष,रा-सोलापूर) असे मुस्लिम तरुणाचे नाव असून खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खाली पाडून त्याला तुडवल्यामुळे छातीमधील बरगड्याना गंभीर दुखापत झाली आहे व लाथाबुक्क्यांनी तोंडावर, कानावर मारहाण केल्याने कानात रक्तस्राव होत आहे. एका हिंदू तरुणीशी तुझे काय संबंध आहेत, तू मुस्लिम आहेस, असे म्हणत त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. तसेच पीडित हिंदू तरुणीस देखील दमदाटी देत तिच्या नातेवाईकांना तुमच्या मुलीचे अनैतिक संबंध असल्याची खोटी माहिती देण्यात आली आहे.
पीडित तरुणीने मुस्लिम तरुणाची बाजू घेत,आमचे अनैतिक संबंध नसून,कौटुंबिक व भाऊ बहिणीसारखे संबंध असल्याची माहिती दिली आहे. तसेच समाजात अनेक हिंदू मुलींचे मुस्लिम धर्मातील नागरिकांशी, तरुणांशी या ना त्या कारणाने, काही कामानिमित्त संपर्क येत असतो. त्याकडे लव जिहाद किंवा इतर अनैतिक संबंध आहेत या नजरेने पाहू नये, असा सामाजिक संदेश पीडित तरूणीने दिला आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत मुस्लिम तरुण बोलत बसला या कारणाने मारहाण करणाऱ्या हिंदू संघटनांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देखील दिला असल्याची माहिती पीडित तरुणीने दिली आहे.
पीडित तरुणीचे व मुस्लिम तरुणाचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक नाते
पीडित तरूणी व मुस्लीम तरुण मुजाहिद पठाण याचे गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक नाते आहे. दोघे सोलापुरातील एका खाजगी कार्यालयात काम करत होते. मुजाहिद याचे लग्न झाले असून पीडित तरूणी ही अविवाहित व शिक्षण घेत आहे. शैक्षणिक कामानिमित्त पीडित हिंदू तरूणीने मुजाहिदला १ मार्च २०२३ रोजी एम्प्लॉयमेंट चौक येथे बोलावले होते. कामानिमित्त वेळ लागत असल्याने दोघे आईस्क्रीम खाण्यासाठी आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले.
‘हिंदू संघटनेचे कार्यकर्ते आले अन विचारपूस करू लागले’
पीडित हिंदू तरूणी व मुजाहिद पठाण हे दोघे आईस्क्रीम खात असताना काही वेळातच एका हिंदू संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आले. तू हिंदू असून मुस्लीम तरुणाशी बसतेस का असा जाब विचारू लागले. पीडित तरुणीने अनेक विनवण्या केल्या, पण काहीएक ऐकण्यात आले नाही. ओळखपत्र पाहून तरूणीच्या नातेवाईकांना हिंदू संघटनेच्या तरुणांनी तुमच्या मुलीचे मुस्लीम तरुणाशी अनैतिक संबंध आहेत असे सांगत तिला आईस्क्रीम पार्लरमधून बाहेर काढले. मुजाहिद पठाण या तरुणाला देखील मारहाण करत त्याला एम्प्लॉयमेंट चौकातील बाजूच्या गल्लीत घेऊन गेले व बेदम मारहाण करू लागले. तरूणी ही पोलिसांकडे जाऊन शहानिशा करा अशी विनंती करत होती.
जय श्रीरामचे नारे देत आणखी हिंदू तरुणांना बोलावले,मारहाण केली- मुजाहिद पठाण
मुजाहिद पठाण या मुस्लिम तरुणाने दिलेल्या माहितीनुसार,एम्प्लॉयमेंट चौकातील एका गल्लीत मला घेऊन गेले आणि मारहाण करू लागले. त्यावेळी मोबाईल वरून कॉल करत,जय श्री रामचे नारे देत,आणखीन हिंदू तरुणांना बोलावून मला मारत होते. असह्य वेदना होताना देखील मला खाली पाडून तुडवत होते. जवळपास अर्धा तास मारहाण करत होते. काही वेळाने मी कॉल करून माझ्या वडिलांना बोलावून घेतले. माझे वडील हिजबरखान पठाण यांनी एम्प्लॉयमेंट चौक येथे येऊन माझी सुटका केली व मला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
माझे कुटुंब दहशतीखाली; सर्व खात्री करून पोलीस ठाण्यात अर्ज दिला’
मुजाहिद पठाण या तरुणाने माहिती देताना सांगितले की,माझे कुटुंबीय भयंकर दहशतीखाली आहे. वडिलांनी व माझ्या पत्नीने सुरुवातीला संबंधित हिंदू तरूणीशी संपर्क साधला. सविस्तर माहिती जाणून घेतली. माझे व पीडित तरूणीशी कसलेही अनैतिक संबंध नसल्याची खात्री केली. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास माझ्या कुटुंबीयांनी सल्ला दिला. खाजगी रुग्णालयात उपचार करून मी व संबंधित हिंदू तरूणीने सदर बाजार पोलीस ठाण्यात ६ मार्च रोजी रीतसर लेखी अर्ज दिला आहे.