राष्ट्रवादीत मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? अमित शाहांसोबत पार्थ-सुनेत्रा पवारांची दिल्लीत गुप्त खलबतं..


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत बदलांच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २१) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेले अर्थखाते पुन्हा मिळण्यासह मंत्रिमंडळातील फेरबदलांबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.

तीन दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य बदलांबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अर्थखात्यासह मंत्रिपदांमध्येही बदल होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असलेले अर्थखाते पुन्हा पक्षाला मिळावे, अशी भूमिका पक्षाच्या नेतृत्वाकडून मांडण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय मंत्रिमंडळातील काही मंत्रिपदांमध्ये बदल करण्याची इच्छाही अमित शाह यांच्याकडे व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत फेरबदल होण्याची शक्यता असून, यासंदर्भात अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

पार्थ पवारांकडे पक्षाची कमान?

गेल्या काही दिवसांपासून खासदार पार्थ पवार पक्षातील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये सक्रिय असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके कोणते बदल होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अर्थखात्याचा मुद्दा, मंत्रिपदांमधील संभाव्य फेरबदल आणि पक्षांतर्गत बदल याबाबतच्या चर्चांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या चर्चांना पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!