परळीत राडा! पेट्रोल ओतलं, अंगाला आग, हातपाय जळाले, कराड समर्थक आक्रमक…

बीड : येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर काल मोक्का लावण्यात आला. यानंतर काल परळीत कराडच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा करत परळी बंदची हाक दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी परळीतील पोलिस स्टेशनबाहेर धक्कादायक प्रकार घडवला. आज रात्री एक समर्थक अंगावर आग लावून घेत असल्याची घटना घडली. या आगीत त्याचे पाय जळाले असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळपासूनच वाल्मिक कराड यांच्या समर्थनासाठी सुरू असलेल्या आंदोलनात तणाव वाढला आहे. आधीच तीन जणांनी अंगावर रॉकेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण नागरिकांच्या मदतीने ते वाचवले गेले.
पेटवलेल्या घटनांमुळे परळीमध्ये वातावरण अधिकच गरम झाले आहे. आंदोलनाची सुरुवात पाण्याच्या टाकीवर चढून झाली होती, ज्यानंतर एका कार्यकर्त्याला भोवळ येऊन तो कोसळला.
त्यानंतर या आंदोलनात कराड यांची आई देखील सहभागी झाली असून, त्यांची तब्येतही खराब झाली आहे. आंदोलन अधिक आक्रमक होत असून, टायर जाळणे, बसवर दगडफेक करणे यांसारखे प्रकार सुरू आहेत.