धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा का? छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच केलं मोठं वक्तव्य, म्हणाले….

बीड : बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. याबाबत अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. आता दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. दोघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराडचे संबंध धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. तपासावर परिणाम होऊ नये, यासाठी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. तर, भुजबळांनी मुंडेंच्या राजीनाम्याला विरोध दर्शवला आहे. त्यावर भाष्य करताना भुजबळांनी मनात दाबून ठेवलेली सल बोलून दाखवली.
बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. बीड प्रकरणातील दोषींवर कारवाई होणारच असल्याचे त्यांनी म्हटले. धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय, असा सवाल त्यांनी केला.
चौकशीत काही समोर आलंय का, तुमच्याकडे काही माहिती असेल तर पोलिसांना द्यावी. मात्र, साप म्हणून भुई थोपटता कामा नये असे भुजबळ यांनी सांगितले. चौकशीत काही समोर आल्यास मुख्यमंत्री स्वत: त्यांना सूचना देतील. मात्र, उगाच कोणावरही अन्याय होता कामा नये असेही भुजबळ यांनी म्हटले.
दरम्यान, अनेक वर्ष लोकांची कामे केल्यानंतर एखादा व्यक्ती मंत्री होतो. त्यामुळे त्याचा राजीनामा असे मागणे चुकीचे असल्याचे भुजबळांनी सांगितले. भुजबळांनी धनंजय मुंडे यांचा बचाव करताना आपल्या मनातली सल बोलून दाखवली. भुजबळांनी म्हटले की, माझ्याबाबत ही असा प्रकार झाला आहे. तेलगी प्रकरणात मी त्याला पकडले, त्याला जेलमध्ये टाकले आणि मलाच त्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. असे ते म्हणाले आहे.
तेलगीचे प्रकरण माझ्या काळात बाहेर काढण्यात आले. त्याची बनावट स्टॅम्प पेपरची प्रेसही आम्ही पकडली. तेलगीवर मोक्का अंतर्गत गुन्हाही मीच लावला. तेलगीच्या प्रकरणात मीच सीबीआय चौकशी मागितली. तरीही माझा राजीनामा मागण्यात आला. पुढे आम्हाला चौकशीसाठी बोलवण्यात आले.
चौकशीनंतर तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुम्ही केलेली कारवाई योग्य होती असे भुजबळांनी सांगितले. हे सगळं मी भोगलं आहे. त्यामुळे काहीही सिद्ध झाले नसताना राजीनामा मागणे मला योग्य वाटत नसल्याचे भुजबळांनी सांगितले आहे.