धक्कादायक! मगरपट्ट्यातील अलिशान स्पा सेंटरचं काळं सत्य उघड; पोलिसांच्या छाप्यात मोठा पर्दाफाश


पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मगरपट्टा येथील सिझन्स मॉलसमोरील ‘द कॉस्मो पॉलिस’ इमारतीमध्ये ‘द फॉरेव्हर’ नावाचे स्पा सेंटर सुरू होते. या स्पा सेंटरच्या नावाखाली कथित वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरची महिला मालकीण आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकाराचा हडपसर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे रचलेल्या सापळ्यात मगरपट्टा परिसरातील या स्पा सेंटरमधील काळे सत्य उघडकीस आले. कारवाईदरम्यान तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी हायप्रोफाईल महिला मालकीण आणि तिच्या मॅनेजरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली बाहेरून तरुणींना आणले जात होते. त्यांना पैशांचे मोठे आमिष दाखवून कथित वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

‘द फॉरेव्हर’ स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. थेट छापा टाकण्यापूर्वी पोलिसांनी एक बनावट ग्राहक स्पा सेंटरमध्ये पाठवला. तेथे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर बुधवारी (दि. २२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला.

या धडक कारवाईत घटनास्थळावरून तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. तसेच स्पा सेंटरची मालकीण अश्विनी मुरडे (रा. कल्याणीनगर) आणि मॅनेजर रकबुल अब्दुल हुसेन यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार बाबू लोणकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, हडपसर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!