लग्नाचा मुहूर्त… मंडपात वरमाला… अन् अचानक आला ‘पहिला नवरा’; नागपुरात उघड झाला ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा थरारक खेळ

नागपूर : नागपूरमध्ये विवाहाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या कथित ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. गुजरातमधील विवाहासाठी इच्छुक तरुणाला नागपुरात बोलावून त्याच्याकडून रोख रक्कम आणि दागिने उकळण्यात आले. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली, मंदिरात विधी सुरू होण्याच्या तयारीत असतानाच एका व्यक्तीने अचानक प्रवेश करत “ही माझी पत्नी आहे” असा दावा केला आणि काही क्षणांत संपूर्ण कट उघड झाला. या घटनेनंतर सीताबर्डी पोलिसांनी मुख्य सूत्रधार राणी उर्फ कोमल पांडे हिला अटक केली असून न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने राज्याबाहेरील अनेक तरुणांना लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुजरातच्या भावनगर येथील कुरिअर व्यावसायिक आकाश जिंदल पारेख हा विवाहासाठी वधूच्या शोधात होता. त्यावेळी त्याचा संपर्क राणी पांडे हिच्याशी झाला. राणीने स्वतःला एका तरुणीची बहीण असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. काही दिवसांच्या बोलण्यानंतर आकाशला नागपुरात बोलावण्यात आले. कोराडी परिसरातील एका घरात त्याची कथित वधू नम्रताशी भेट घडवण्यात आली. दोन्ही बाजूंनी लग्नाला होकार मिळाल्याचे वातावरण तयार करण्यात आले.

त्यानंतर लग्नाच्या खर्चासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगत आकाशकडून 70 हजार रुपये रोख तसेच सोन्या-चांदीचे दागिने घेण्यात आले. ठरलेल्या दिवशी सीताबर्डीतील मंदिरात विवाहासाठी मंडप सजवण्यात आला. नवरदेव, नवरी आणि काही जण उपस्थित असताना विधी सुरू होणार इतक्यात एक व्यक्ती धावतच मंदिरात आला. त्याने नम्रता ही स्वतःची कायदेशीर पत्नी असल्याचा दावा करत गोंधळ घातला. सुरुवातीला उपस्थितांना हा प्रकार समजला नाही; मात्र त्याने काही कागदपत्रे आणि माहिती समोर मांडल्यानंतर आकाशच्या लक्षात आले की, आपण मोठ्या फसवणुकीचा बळी ठरलो आहोत.


धक्क्यातून सावरताच आकाशने थेट सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत मुख्य सूत्रधार राणी उर्फ कोमल पांडे हिला ताब्यात घेतले. चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून या काळात टोळीतील इतर सदस्य, मध्यस्थ आणि आर्थिक व्यवहारांचा तपास केला जाणार आहे.
प्राथमिक चौकशीत राणी पांडे हिच्याविरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीची प्रकरणे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे ही एक संघटित टोळी असण्याची शक्यता अधिक बळावली आहे. विवाहासाठी इच्छुक तरुणांना लक्ष्य करून त्यांच्याकडून पैसे, दागिने आणि इतर आर्थिक लाभ उकळण्याचा हा ठरवून आखलेला डाव असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध सुरू असून मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. या टोळीने इतर राज्यांतील किती तरुणांची फसवणूक केली आहे, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे या तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेनंतर विवाहासाठी सोशल मीडिया, मध्यस्थ किंवा अपरिचित व्यक्तींमार्फत येणाऱ्या प्रस्तावांची संपूर्ण पडताळणी करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. लग्नाच्या नावाखाली वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे अशा प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.