‘जेएनयू’ मध्ये धक्कादायक प्रकार; प्राध्यापकांन सुट्टी घेतली म्हणून सेवासमाप्ती, कुलगुरूंचा वादग्रस्त निर्णय..

पुणे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका प्राध्यापकांने वैद्यकीय कारणामुळे सुट्टी घेतल्यामुळे त्यांची कुलगुरूंनी सेवा समाप्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे ‘जेएनयू’च्या प्राध्यापकांमध्ये संतापाची भावना असून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिक्षक संघाने प्राध्यापकावरील कारवाईचा निषेध केला आहे; त्याचप्रमाणे संबंधित प्राध्यापकाच्या सेवा समितीचा आदेश तातडीने मागे घेण्याची विनंती शिक्षक संघाने केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक विज्ञान शाळेतील प्राध्यापक डॉ. रोहन चौधरी यांची नियुक्ती मार्च २०२४ मध्ये झाली. त्यानंतर १२ महिन्यांच्या परिविक्षाधीन कालावधीवर ते विद्यापीठात रुजू झाले. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तो अचानक न सांगता सहा महिन्यांनी वाढविण्यात आला. या काळात लहान मुलाची तब्येत बिघडल्याने त्यांनी नियमित सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त काही दिवस वैद्यकीय कारणांमुळे सुट्टी घेतली. या काळात त्यांना ई-ऑफिसवर लॉग इन करून रजेचा अर्ज करण्यास जमले नाही. मात्र, त्यांनी विभागप्रमुखांना याबाबत माहिती दिली होती. असे असतानाही कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी डॉ. चौधरी यांच्या रजेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली.
दरम्यान कुलगुरूंनी नेमलेल्या या समितीने डॉ. चौधरी यांनी ५१ दिवसांची सुट्टी घेतली असून, रजेचे व ‘सीसीएस’ नियमांचे उल्लंघन केले, असा उल्लेख अहवालात केला आहे. मात्र, नेमके कोणते नियम मोडले याचा ठोस संदर्भ दिलेला नाही. त्यानंतर कुलगुरूंनी त्यांच्याबाबतच्या सेवा समाप्तीच्या घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षण संघाने नाराजी व्यक्त केली आहे.
