बारामतीमधील धक्कादायक घटना! दहावीतील मुलीने संपवलं जीवन, मुलाने लग्नासाठी धमकी दिल्याने घेतला टोकाचा निर्णय…

बारामती : बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील तरूणाच्या त्रासाने मुलीने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे.
तसेच आत्महत्या केलेल्या मुलीने आता गेल्या काही दिवसांपूर्वी दहावीची परीक्षा दिली होती. मुलीच्या आई-वडिलांना आरोपीने मारण्याची धमकी दिली होती. गेले अनेक महिने आरोपी हा मुलीला मानसिक त्रास देत होता. घरच्यांना न सांगता मुलीन टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता.
मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती.
दरम्यान, ७ एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे.