राम मंदिर चोरी प्रकरणाचा धक्कादायक CCTV खुलासा; नोटांचे बंडल सॉक्समध्ये लपवताना ५ कर्मचारी कॅमेऱ्यात कैद


अयोध्या : राम मंदिरातील देणगी निधीच्या अपहारप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी किमान पाच कर्मचारी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पैशांची मोजणी करताना नोटांची बंडले कपड्यांमध्ये आणि सॉक्समध्ये लपवत असल्याचे दिसून आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अयोध्या पोलिसांनी राम मंदिराच्या पिलग्रिम फॅसिलिटी सेंटरमधील तब्बल ४५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासादरम्यान पैशांची मोजणी करणारे पाच कर्मचारी नोटांची बंडले लपवून स्वतःजवळ ठेवत असल्याचे कथितपणे आढळून आले. या प्रकरणानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

दरम्यान, ज्या मनुष्यबळ पुरवठा एजन्सीमार्फत काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्या एजन्सीने या कर्मचाऱ्यांची निवड आपण केली नसल्याचा दावा केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींशी संबंधित विविध ठिकाणी छापे टाकून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मंदिरातील विविध दानपेट्यांमधील रक्कम मोजण्यासाठी ट्रस्टने सुमारे ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही कर्मचारी पैशांच्या ढिगातून नोटांची बंडले काढून ती कपड्यांमध्ये किंवा सॉक्समध्ये लपवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित आरोपींच्या ठिकाणी केलेल्या छाप्यांमध्ये काही रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

तथापि, मंदिर प्रशासनाकडे केवळ ४५ दिवसांचेच सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याने हा प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच चोरीच्या पैशांतून मालमत्ता किंवा इतर संपत्ती खरेदी करण्यात आली आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याशिवाय, देणगीतील रक्कम अपहार करण्यासाठी इतर कोणते मार्ग वापरले गेले होते का, याचाही तपास सुरू असून, या प्रकरणात काही बँक कर्मचाऱ्यांची भूमिकाही तपासली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणातील आठ आरोपींपैकी सहा जणांची नियुक्ती स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत वाराणसीस्थित एका मनुष्यबळ पुरवठा संस्थेद्वारे करण्यात आली होती. मात्र, संबंधित एजन्सीने आपण केवळ हाऊसकीपिंग कर्मचारी उपलब्ध करून देत असल्याचा दावा केला असून, त्या कर्मचाऱ्यांकडून कोणते काम करून घेतले जाते, याची जबाबदारी संबंधित संस्था किंवा बँकेची असल्याचे स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!