ठाकरेंसह शिंदेंची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात ‘या ‘तारखेला होणार अखेर सुनावणी..

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवरील दावा सोडलेला नाही. याबाबत सुप्रीम कोर्टात लढाई सुरू ठेवली आहे. अशातच आता कोर्टाकडून लवकरच याबाबतचा निर्णय सुनावला जाण्याची शक्यता असून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात 8 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यातील वादावर राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाकडून सल्ला मागितला आहे. यावर उत्तर देण्यासाठी कोर्टाने घटनापीठ तयार केलं असून हे पीठ 19 ऑगस्टपासून सुनावणी सुरू करणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे सुद्धा या घटनापीठात आहेत. त्यामुळे शिवसेना वादाचा निकाल ऑक्टोबरमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे. संगणक प्रणालीत 8 ऑक्टोबर ही सुनावणीसाठीची तारीख टाकण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून झाल्यावर कोर्ट अंतिम निर्णय देईल. त्यामुळे शिवसेना कोणाची, याबाबतचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास घेण्यात येणार आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणीही ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने हा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच येणार आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.