सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं, पण नवऱ्यानंच आयुष्य उद्ध्वस्त केलं; सासू अन् दिराचाही छळ, पुण्यात २१ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी अंत


पुणे : लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या एका २१ वर्षीय विवाहितेचा पुण्यात दुर्दैवी अंत झाला आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्यांकडून तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप आहे.

माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्याकडे सातत्याने तगादा लावला जात होता. या त्रासाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना लोणीकंदजवळील भरतवाडी परिसरातील पिंपरी-सांडस गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू आणि दीराला अटक केली आहे.

हिना असिफ पटेल (वय २१, रा. भरतवाडी, पिंपरी-सांडस, बागवान वस्ती, हवेली) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिची आई शमीम मुसा शेख (वय ४०, रा. मातोजीनगर, पिंपरी-चिंचवड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

लग्नानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा

समोर आलेल्या माहितीनुसार, हिना आणि आसिफ यांचा ३० मे २०२४ रोजी निकाह झाला होता. लग्नानंतर हिना सासरी नांदत होती. मात्र, काही महिन्यांतच सासरच्यांकडून तिला त्रास देण्यास सुरुवात झाल्याचा आरोप आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्याकडे वारंवार मागणी केली जात होती.

सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या या त्रासामुळे हिना मानसिक तणावात होती, अशी माहिती समोर आली आहे. अखेर १७ ऑक्टोबर रोजी तिने राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पतीसह सासू आणि दीराला अटक

हिनाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिचा पती, सासू आणि दीराला अटक केली आहे. आसिफ मशाक पटेल (वय २५), साहेरा बेगम मशाक पटेल (वय ४२) आणि सिदीप मशाक पटेल (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास मोटे करीत आहेत. पोलिसांच्या तपासातून या घटनेबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!