Sharad Pawar : हर्षवर्धन पाटलांबाबत शरद पवारांचे मोठे संकेत, मोठं वक्तव्य करत म्हणाले आज दुपारपर्यंत….

Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देऊन इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होत्या.
तसेच काल(गुरूवारी) हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश करण्याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे.
अशातच आज दुपारपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे, त्यावर आज सांगलीमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
सांगली दौऱ्यावर असताना शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांचे दुपार पर्यंत काय होतंय बघूया. दुपारी माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला या, असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. आज दुपारपर्यंत हर्षवर्धन पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटात जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. इंदापूर शहरातील त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयावरील संपूर्ण फलक हटवण्यात आले असून त्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो व कमळ चिन्ह देखील काढण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.