Sharad Pawar : इंदापूरमध्ये डाव टाकला, आता फलटणचा नंबर शरद पवार यांनी थेट तारीखच सांगितली, रामराजेही देणार अजित पवारांना धक्का…

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.
यावेळी पवार यांनी साताऱ्यातील ज्येष्ठ नेते, विधानसभेचे माजी सभापती आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल संकेत दिले आहेत. मी या कार्यक्रमाला येताना फलटण येथून फोन आला. या नेत्याने मला १४ ऑक्टोबरला फलटणला येण्याचा आग्रह केला आहे. जो कार्यक्रम इंदापुरात होत आहे, तोच कार्यक्रम फलटणला होणार आहे. तुमच्या लक्षात आले असेल मी कोणाबद्दल बोलतोय,” असे पवार म्हणाले.
पुढील महिनाभर माझ्या सर्व तारखा बुक आहेत, सर्वांच्या मनात परिवर्तनाचा विचार आहे, असेही ते म्हणाले. निंबाळकर सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत, पण त्यांनी त्यांची नाराजी स्पष्ट व्यक्त केली होती.
दरम्यान, शरद पवार यांचा खास मर्जीतला माणूस म्हणून रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याचं राजकारण हाताळणारे नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र अजित पवारांसोबत गेल्यानं रामराजेंच्या कार्यकर्त्यांची जास्त कुचंबना झाल्याची भावना त्यांनी नुकतीच बोलून दाखवली.
त्यामुळं रामराजे आता अजितदादांचा पक्ष सोडतील अशी शक्यता आहे. रामराजेंनी जर शरद पवारांची साथ दिली तर फलटण, वाई, कोरेगाव आणि माण या मतदारसंघांवर थेट परिणाम होऊन महायुतीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.