Sharad Pawar Group : सातारा, रावेरचे उमेदवार ठरले! बडा नेता साताऱ्याच्या रिंगणात, शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर…

Sharad Pawar Group : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत.
यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचार संहिता लागू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनच्या जागावाटपच्या भिजत घोंगड्यावर महाविकास आघाडीनं तोडगा काढला, पण अद्याप अनेक मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी १० जागा सुटल्या असून त्यापैकी ७ उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करुन पक्षाने आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना आणि रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे.
महाविकास आघाडीनं मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला. जागावाटप जाहीर झाला असला तरीही महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अशातच आज शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे.
यासंदर्भात ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ट्वीटमध्ये म्हटलंय की, तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया!
माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांना मिळाली आहे. शरद पवार यांच्याकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव पवारांकडून सर्वात आघाडीवर आहे. Sharad Pawar Group
मोहिते पाटील उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, ते लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होणार आहे. मोहिते पाटील याआधी शरद पवार यांच्यासोबतच होते, त्यामुळे घरवापसी झाल्यास त्यांना उमेदवारी मिळू शकते.
मोहिते पाटील यांच्याशिवाय अनिकेत देशमुख आणि अभयसिंह जगताप यांची नावेही चर्चेत आहेत. अनिकेत देशमुख यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. माढ्यात शरद पवार काय निर्णय घेतात, हे काही दिवसांत स्पष्ट होईल