अभिजित दिपके यांच्या बहिणीचा गंभीर आरोप! जीवाला धोका असल्याचा दावा; राष्ट्रपतींकडे धाव, सुरक्षेची मोठी मागणी

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर CJP ठाम असल्याचे पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकार आणि CJPच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेत पक्षाने मांडलेल्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या मान्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सर्वात महत्त्वाची असलेली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. या मुद्द्यावर सरकारने दुपारपर्यंत वेळ मागितला असून, आज पुन्हा दोन्ही बाजूंमध्ये बैठक होणार आहे.

CJPने स्पष्ट इशारा दिला आहे की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा निर्णय होईपर्यंत जंतर-मंतरवरील आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही. NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अनेक ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. दिपके यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी दिल्ली पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला आहे. तसेच, महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी करत राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
अभिजित दिपके यांच्या बहिणी स्नेहा जितिन वंजारे यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन दिले असून, दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीहल्ल्याचा उल्लेख करत अभिजित दिपके यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. कुटुंबीयांचा त्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, अभिजित दिपके यांची प्रकृती खालावल्याची माहितीही समोर येत असून, सरकार आणि CJP यांच्यातील आजच्या बैठकीकडे देशभरातील विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.