मुंबई -गोवा महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात ; सुदैवाने दुर्घटना टळली….

पुणे : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना मुंबई–गोवा महामार्गावर खाजगी बसचा अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात आज पहाटे खासगी बसचा भीषण अपघात झाला. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात खाजगी बस चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट महामार्गाच्या कडील असलेल्या एका विद्युत पोलवर जाऊन आदळली. हे धडक इतकी जोरदार होती की, यात विद्युत पोल कोसळला आणि बस पुढे घसरत जाऊन थेट बाजारपेठेतील दुकानात घुसली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.या भीषण अपघातात बसचा पुढील भाग पूर्णपणे विद्रूप झाला आहे. स्थानिक दुकानाचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान या अपघातात सुदैवाने ही बस रिकामी होती. तसेच अपघाताची वेळ पहाटेची असल्याने बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती आणि रस्त्यावरील वाहतूकही कमी होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अन्यथा हा अपघात आणखी गंभीर ठरला असता.
